बारामती तालुक्यातील खांडज येथील एका ५८ वर्षीय इसमाचा खून करून मृतदेह विहिरीत फेकून दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेने बारामतीत खळबळ उडाली आहे. मारुती साहेबराव रोमण असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी विजय मारुती रोमण यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. माळेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. नवनाथ शिवाजी घोगरे (वय २५, मूळ रा. कार्लेभाजे, लोणावळा, ता. मावळ) व अनिल गोविंद जाधव (वय ३५, रा. आंबेवाडी, ता. रोहा, जि. रायगड) या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.
वृत्तानुसार, ५ ते ७ मे या दरम्यान ही घटना घडली आहे. मारुती रोमण यांच्यावर कोणत्या तरी टणक वस्तूने प्रहार करत त्यांचा खून करण्यात आला. मृतदेहाच्या गळ्यामध्ये काळ्या रंगाची साडी बांधत त्यात दगडे बांधून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने हा मृतदेह कांतीलाल सयाजी माने यांच्या विहिरीत फेकण्यात आला होता. पोलिसांनी याप्रकरणी माहिती मिळताच तात्काळ कायदेशीर तपास सुरु कऱण्यात आला.
हा मृत्यू संशयास्पद असल्याचे पोलिसांना जाणवले. मृतदेह शवविच्छेदनासाठी बारामतीच्या उपजिल्हा रुग्णालयात नेला. तपासणीत त्यांची हत्या झाल्याचे समोर आले. सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन लोखंडे यांनी गुन्हे शोध पथक व पोलिस अंमलदारांची दोन पथके तयार करत तपासाला सुरुवात केली.

तपासादरम्यान, मारुती रोमण यांना मजूरीच्या कामासाठी आलेल्या दोघांसोबत अखेरचे पाहिल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मृतदेह टाकलेल्या विहिरीपासून काही अंतरावर खोपी बांधून राहणाऱ्या घोगरे व जाधव यांच्याकडे पोलिसांची संशयाची सुई वळली. या दोघांकडे ही पोलिसांनी कसून चौकशीला सुरुवात केली.
परंतु या दोघांनीही आम्ही रोमण यांना ओळखत नसल्याचे उडवाउडवीची उत्तरे दिली. इतर मजूर महिलांकडे महिला पोलिसांनी चौकशी केली असता पुरुष व महिला मजूर यांच्या माहितीमध्ये विसंगती दिसून आली. त्यामुळे हे दोघे काहीतरी लपवत असल्याचा दाट संशय पोलिसांना आला. त्यामुळे या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेत सखोल चौकशी सुरु केली.
या चौकशीत मयत मारुती रोमण यांनी घोगरे याच्या नातलग महिलेकडे शरीर सुखाची मागणी केली होती. ही बाब महिलेने या दोघांना सांगितली होती. त्यातून घोगरे याने जाधव याच्या साथीने रोमण यांना बोलावून घेत त्यांच्याशी गोड बोलून निर्जनस्थळी नेले, तेथे डोक्यात दगड घालून खून केला.
मयताची ओळख पटू नये यासाठी त्यांचे कपडे काढून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने ती जाळण्यात आली. मृतदेह काही काळ ऊसाच्या शेतात लपवून नंतर रात्रीच्या अंधारात विहिरीत टाकण्यात आला. विहिरीतून तो लवकर वर येऊ नये यासाठी मृतदेहाचे हातपाय साडीने बांधून त्यात मोठमोठी दगडे टाकण्यात आल्याची या दोघांनी कबुली दिली.
हेही वाचा –
भारत-पाक तणावातही IPL होणार? मित्रदेशाने पुढे केला मदतीचा हात
मोदी साहेबांनी ठरवलं तर अर्धा तासात पाकिस्तान संपेल
पाकडे पुन्हा पिसाळले, भारतीय सैन्याने सगळे ड्रोन पाडले