आगामी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने शिवसेना ठाकरे गटाच्या आमदारांची आज मातोश्रीवर बैठक संपन्न झाली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडली.
रुग्णालयातून घरी आल्यानंतर त्यांनी विधानसभा निवडणुकांच्या अनुषगाने तयारी सुरू केली आहे. या बैठकीत उद्धव ठाकरेंनी निवडणुकीच्या अनुषंगाने विद्यमान आमदारांना मार्गदर्शन केले.
ठाकरे गटाच्या शिवसेना पक्षाच्या बैठकीसाठी उपस्थित राहिलेल्या विद्यमान आमदारांमधील बहुतांश आमदारांची उमेदवारीही निश्चित मानली जात आहे. यादी जाहीर होण्याची वाट बघू नका, तुमच्याबाबतीत ती सर्व औपचारिकता आहे, असे म्हणत आजच्या बैठकीमध्ये विद्यमान आमदारांना एबी फॉर्म देखील पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून देण्यात आल्याची माहिती आहे.
तसेच, २२ ऑक्टोबरपासून विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या सूचनाही या उमेदवारांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे, आजच्या बैठकीकडे राज्यातील शिवसेना व ठाकरे गटाचे नेते लक्ष लागले होते.
केंद्रीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकांची घोषणा केल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महायुती व महाविकास आघाडीकडून लवकरात लवकर उमेदवारांची यादी जाहीर करुन उमेदवारांना प्रचारासाठी मैदानात उतरवले जाणार आहे. त्यामुळे आजच विद्यमान आमदारांना आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पक्षप्रमुखांकडून एबी फॉर्म दिले गेल्याची सुत्रांची माहिती आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे एकूण १५ विद्यमान आमदार या बैठकीला उपस्थित होते.