सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील कराडीच्या डोंगरांमधील जंगलात एका अमेरिकन महिलेला लोखंडी साखळीने बांधून ठेवले असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे, या महिले सोबत तिच्या पतीनेच असे कृत्य केल्याची माहिती समोर आलेली आहे. महिलेने स्वतःने एका कागदावर लिहून तिच्या बाबतीत घडलेल्या घटनांची माहिती दिली आहे.
महिलेला पतीनेच बांधून ठेवले; तामिळनाडूतील पत्ता
ही महिला मूळची अमेरिकन असून, अनेक वर्षांपासून तामिळनाडूत राहते. तिच्या आधारकार्डावर तामिळनाडूचा पत्ता दर्शविला आहे, परंतु तिच्या पासपोर्टावर अमेरिकन देशाचे चिन्ह आहे. सिंधुदुर्ग पोलिसांनी तिला अधिक उपचारासाठी गोवा मेडिकल कॉलेज, बांबोलीममध्ये दाखल केले आहे.
महिला काही दिवसांपासून अन्न-पाण्याशिवाय जंगलात बांधलेल्या अवस्थेत होती, असे तिने लेखीपणे सांगितले आहे. सदर महिला किती दिवस या अवस्थेत होती हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
सावंतवाडीतील शेतकऱ्यांनी केली महिलेला सुटका
शनिवारी, कराडीच्या डोंगरात शेतकरी आणि गुराख्यांना महिलेच्या किंकाळ्यांचा आवाज ऐकू आला. त्यांनी त्या आवाजाच्या दिशेने शोध घेण्याचा निर्णय घेतला आणि जंगलात जाऊन पाहिले. त्यांना एका झाडाच्या बुंध्याला बांधलेल्या अवस्थेत महिला सापडली. महिलेला पाहून शेतकरी आणि गुराखी घाबरले आणि तातडीने पोलिसांना आणि जवळपासच्या गावकऱ्यांना याबद्दल माहिती दिली.
पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून महिलेला सुटकेसाठी मदत केली आणि तिच्या पायाची साखळी तोडून तिची सुटका केली. प्राथमिक उपचारांनंतर तिला सावंतवाडीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पण सध्या तिची प्रकृती गंभीर आहे.
महिलेनं पतीवर केले गंभीर आरोप, तपास सुरू
रुग्णालयात दाखल झाल्यानंतर, महिलेला नीट बोलता येत नसल्यामुळे तिने कागदावर लिहून तिच्या स्थितीची माहिती दिली. तिने लिहिले की, तिच्या पतीनेच तिला झाडाला बांधून ठेवले होते आणि तिच्या शरीरात काही इंजेक्शन दिल्यामुळे तिचा जबडा हालू शकत नव्हता.
महिला दावा करत आहे की, ती 40 दिवसांपासून अन्न-पाण्याशिवाय जंगलात अशा अवस्थेत होती. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, तामिळनाडूतील तिच्या पतीवर आरोपांची चौकशी करण्यासाठी पथक पाठवले आहे.
महिला यापूर्वी दिल्ली, मुंबई आणि गोवा येथील डॉक्टरांच्या संपर्कात होती. तिच्या कडून मिळालेल्या कागदपत्रांवरून तपासाची गती वाढवण्यात आलेली आहे. पोलिसांनी सांगितले आहे की, ठोस माहिती मिळाल्यानंतरच पुढील तपासावर आधारित निर्णय घेता येईल.