भटके कुत्रे, त्यांची संख्या, त्यातून निर्माण होणाऱ्या समस्या आणि त्यावरील उपाययोजना हा मागील काही दशकांमध्ये जगभरात चर्चेचा आणि चिंतेचा विषय आहे.
यासंदर्भात कोणत्या योग्य उपाययोजना आहेत, कोणत्या देशांना त्यात यश आलं आहे आणि सध्या जगभरात नेमका काय ट्रेंड सुरू आहे याबद्दल माहिती देणारा हा लेख…
रेबीज या आजाराचा धोका जगभरात आहे. या आजारामुळे दरवर्षी जवळपास 60 हजार लोकांचा मृत्यू होतो. जागतिक आरोग्य संघटना (WHO)नुसार यातील 99 टक्के प्रकरणं कुत्रा चावल्यामुळे किंवा कुत्र्यानं ओरखडल्यामुळे होतात.
कुत्रा चावल्यानंतर रेबीज टाळण्यासाठी जरी लस उपलब्ध असली तरी, एखाद्याला चेहऱ्यावर किंवा मज्जातंतूजवळ चावा घेतलेला असल्यास रेबीज प्रतिबंधक लस नेहमीच प्रभावी ठरत नाही.
जुलै महिन्यात अराक्कोनम शहरात चार वर्षांचा निर्मल घराबाहेर खेळत होता. तेव्हा त्याच्यावर भटक्या कुत्र्यानं हल्ला केला. त्या लहान मुलाच्या तोंडाचा कुत्र्यानं चावा घेतला तेव्हा त्याचे वडील नुकतेच घरात गेले होते.
“पाणी पिण्यासाठी मी नुकताच घरात गेलो होतो,” असं निर्मल वडील बालाजी यांनी स्थानिक प्रसारमाध्यमांना सांगितलं.
मी परत आलो तर निर्मलच्या तोंडावर जखमा झालेल्या होत्या. त्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत होता,” असं ते पुढे म्हणाले.
निर्मलच्या घरच्यांनी त्याला लगेच हॉस्पिटल मध्ये नेलं. तिथं त्याला 15 दिवस अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलं.
त्यानंतर निर्मलची तब्येत स्थिर झाली, त्याला बरं वाटू लागलं आणि त्यामुळे त्याला हॉस्पिटलमधील सोडण्यात आलं. मात्र घरी आल्यानंतर लगेचच त्याच्यामध्ये रेबीजची लक्षणं दिसू लागली.
निर्मलच्या घरच्यांनी त्याला लगेच हॉस्पिटल मध्ये नेलं. तिथे गेल्यावर तपासणी झाल्यावर लक्षात आलं की रेबीजच्या विषाणूचा त्याच्या मज्जासंस्थेत संसर्ग झाला होता. त्यानंतर दोनच दिवसात निर्मलचा मृत्यू झाला.
काहीवेळा घरातील वडीलधारे रागावतील या भीतीपोटी लहान मुलं त्यांना कुत्रा चावला आहे, ही गोष्ट घरी सांगतच नाहीत. मात्र यामुळे रेबीज प्रतिबंधक लस वेळेत घेतली जात नाही आणि जोपर्यंत लस घेतली जाते तोपर्यंत खूपच उशीर झालेला असतो.
मुंबईत 1994 ते 2015 या कालावधीत 13 लाख लोकांना कुत्र्यांनी चावा घेतला होता. त्यातील 434 लोकांचा रेबीजमुळे मृत्यू झाला.
मात्र हल्ले होणं, चावा घेतला जाणं एवढेच भटक्या कुत्र्यांमुळे असलेले धोके नाहीत.
इंटरनॅशनल कम्पॅनियन अॅनिमल मॅनेजमेंट कोएलिशन (ICAM)या जागतिक स्तरावरील सेवाभावी संस्थेनुसार अनियंत्रित संख्या असलेल्या भटक्या कुत्र्यांमुळे इतरही काही महत्त्वाचे धोके आहेत.
यात रस्त्यावर अपघात होणं, पशुधनाला धोका असणं आणि रस्त्यावरून चालण्यास लोकांनी टाळणं किंवा त्याची चालण्याची भीती वाटणं या धोक्यांचा समावेश आहे.