महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये बैठकांचं सत्र सुरु आहे. या बैठकांमध्ये जागावाटापाचं सूत्र ठरत आहे. या बैठकांमध्ये कोणता पक्ष किती जागा लढेल? याबाबत चर्चा सुरु आहे. विधानसभेची निवडणूक आता जवळ आली आहे.
त्यामुळे महाविकास आघाडीचं फायनल जागावाटप कधीपर्यंत निश्चित होईल? याबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत जोरदार खलबतं सुरु आहेत. महाविकास आघाडीचं जागावाटप काय असावं? या विषयावर तीनही पक्षाच्या प्रमुख नेत्यांमध्ये मॅरेथॉन बैठका पार पडत आहेत.
या बैठकीत जवळपास 80 टक्के जागावाटपावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या बैठकांनंतर जागावाटपावर अंतिम निर्णय हा तीनही पक्षांचे पक्षश्रेष्ठी घेणार आहेत. तसेच ज्या जागांवर तिढा आहे, त्या जागांचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला जाण्याची शक्यता आहे. असं असताना आता केंद्रीय निवडणूक आयोगाकडून हालचालींना वेग आला आहे.
निवडणूक आयोगाचं पथक आता महाराष्ट्रात येणार आहे. आयोगाच्या अधिकाऱ्यांच्या महाराष्ट्र दौऱ्यानंतर निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला जागावाटप लवकरात लवकर ठरवणं जास्त गरजेचं असणार आहे. जितक्या लवकर जागावाटपाचा फॉर्म्युला ठरेल तितकं चांगलं असणार आहे. कारण तितका वेळ प्रत्येक पक्षाच्या उमेदवाराला निवडणुकीच्या प्रचाराला देता येणार आहे.
या दरम्यान, महाविकास आघाडीचं जागावाटपाचं सूत्र नेमकं कधी जाहीर होईल? याबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील या दोन्ही नेत्यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
नाना पटोले काय म्हणाले?
जागावाटपाची चर्चा सुरू आहे. येणाऱ्या 9 – 10 दिवसात चित्र स्पष्ट होईल. महाविकस आघाडीमध्ये कोण किती जागा लढवेल हे महत्वाचे नाही. तर जनतेच्या विरोधात असलेले सरकार सत्तेतून बाहेर काढणे हे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे, अशी भूमिका नाना पटोले यांनी मांडली.
यावेळी नाना पटोल यांना जागावाटपाचं सूत्र काय ठरलं? याबाबतचा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली. “काही प्रसारमाध्यमांनी तीनही पक्ष 100-100 जागा लढवेल असे सूत्र सांगितले. जागा 288 जागा असताना हे कसे शक्य आहे?”, असा सवाल नाना पटोले यांनी केला.
जयंत पाटील काय म्हणाले?
शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील जागावाटपाबाबत भाष्य केलं आहे. ते जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथे आयोजित कार्यक्रमात बोलत होते. “महाविकास आघाडीच्या जागांचे वाटप लवकरच पूर्ण होईल असं जयंत पाटील म्हणाले.