पान टपरी असो, चहाची टपरी असो, रस्त्यांवरील खड्ड्यांमधून वाट काढणारा टेम्पो असो की आकाशात झेपावलेलं विमान… नरेंद्र मोदी यांच्या समर्थकांच्या मनात गेल्या काही वर्षांपासून एकच यक्षप्रश्न आहे, तो म्हणजे – मोदींची जागा कोण घेणार?
विरोधी पक्षात मोदींची जागा घेऊ शकणारा कोण आहे? असा प्रश्न आधी विचारला जायचा. मात्र, आता हा प्रश्न देखील विचारला जातो आहे की, भाजपात मोदींची जागा घेऊ शकणारा कोण आहे?
तिसऱ्यांदा पंतप्रधान झालेले नरेंद्र मोदी पुढच्या वर्षी 75 वर्षांचे होतील.
निवडणूक निकालानंतर भाजपाचं 400 पारचं स्वप्न अपूर्ण राहिलं.
निवडणूक निकालात धक्का बसल्यानंतर त्यासंदर्भात भाजपामध्ये विचारमंथन होतं आहे. अशा परिस्थितीत भाजपामध्ये आता नव्या वारसदाराची चर्चा सुरू झाली आहे का? भाजपामध्ये नरेंद्र मोदींचा राजकीय वारसदार कोण होऊ शकतं? यामध्ये आरएसएसचीची (राष्ट्रीय स्वयंसेवक संघ) काय भूमिका असू शकते?
नरेंद्र मोदी यांचा वारसदार कोण असेल, याबाबत आरएसएसची भूमिका महत्त्वाची आहे. कारण जाणकारांच्या मते, ज्यावेळेस भाजपा राजकीयदृष्ट्या कमकुवत स्थितीत असते तेव्हा पक्षामध्ये आरएसएसचा (राष्ट्रीय स्वयंसेवक संघ) प्रभाव वाढतो.
त्यातच मोदींचा वारसदार होण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यात राजकीय चढाओढ सुरू झाल्याचे अंदाज राजकीय जाणकारांकडून व्यक्त करण्यात येत आहेत. या गोष्टीला दुजोरा देणाऱ्या काही घटनादेखील घडत आहेत.
हेही वाचा:-
यांनी मागितली हिंदू समाजाची माफी