क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. मुंबई इंडियन्स केपटाऊन संघाने आगामी साऊथ आफ्रिका टी20 2025 स्पर्धेसाठी विदेशी खेळाडूंची घोषणा केली आहे.
मुंबई इंडियन्सने आगामी हंगामासाठी एकूण 6 खेळाडूंची निवड केली आहे. या 6 खेळाडूंमध्ये अफगाणिस्तान आणि इंग्लंडचे प्रत्येकी 2 खेळाडू आहेत.
तर श्रीलंका आणि न्यूझीलंडच्या प्रत्येकी 1 खेळाडूची निवड करण्यात आली आहे. मुंबई इंडियन्स केप टाऊन या सोशल मीडियावरुन अकाउंटवरुन याबाबतची माहिती देण्यात आली आहे. मुंबई इंडियन्स केप टाउन फ्रँचायजीचं मालकी हक्क आयपीएलमधील मुंबई इंडियन्सकडे आहे.
इंग्लंड कसोटी संघाचा कर्णधार बेन स्टोक्स आणि अफगाणिस्तानचा कॅप्टन राशिद खान यांचा समावेश आहे. स्टोक्स आणि राशिद हे दोघे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आघाडीचे अष्टपैलू खेळाडू आहेत.
त्यामुळे साऊथ आफ्रिका टी 20 लीगमध्ये मुंबईला या दोघांकडून दमदार कामगिरीची अपेक्षा असणार आहे. बेन स्टोक्सची या स्पर्धेत खेळण्याची ही पहिलीच वेळ ठरणार आहे.
तसेच अफगाणिस्तानचा ऑलराउंडर अझमतुल्लाह ओमरझई याचाही समावेश आहे. तर इंग्लंडचा अनकॅप्ड खेळाडू क्रिस बेंजामिन यालाही संधी देण्यात आली आहे.या व्यतिरिक्त न्यूझीलंडचा अनुभवी वेगवान गोलंदाज ट्रेन्ट बोल्ट आणि श्रीलंकेच्या नुवान तुषारा याचाही समावेश करण्यात आला आहे.
राशिद आणि ट्रेन्ट या फ्रँचायजीसह आधीपासूनच जोडले गेले आहेत. नुवान तुषारा आणि बेंजामिन हे दोघे याआधीही एमआय केपटाऊनसाठी खेळले आहेत. एमआय केपटाऊनने आगामी हंगामाआधी या दोघांना रिटेन केलं होतं.