कोल्हापूरचा डीपी दादा अर्थात धनंजय पोवार याने बिग बॉस मराठीच्या घरात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. कुणी कितीही चिडलं आणि कितीही लोकं पिसाळून अंगावर आले तरी डीपी दादा हिंमतीने प्रसंगाला तोंड देतोय. एवढंच नाही तर डीपी दादामुळे घरात हसतं-खेळतं वातावरण आहे.
याच डीपी दादाच्या डोळ्यात अश्रू पहायला मिळाले. जिओ सिनेमा अॅपवर अनसीन स्टोरीमध्ये डीपी दादा भावुक झाल्याचं बघायला मिळालं. विषय होता, बहिणींचा. लिव्हिंग रुममध्ये रक्षाबंधनावरील मनोगतं आटोपल्यानंतर घरातील एका भागात डीपी दादा आपल्या आठवणी सांगत आहे. तिथे अंकिता आणि इतर सदस्यदेखील आहेत.
डीपी दादा म्हणतो, राखी पोर्णिमेला धाकटी बहीण कधीच पैसे मागत नाही. त्यांना देण्यासाठी मी कधीच पंपांकडून पैसे घेतले नाहीत. पण मागच्या वर्षी माझ्याकडे पैसे नव्हते.. तसं मी बहिणीला सांगितलं. तिनेही अॅडजस्ट केलं. परंतु पंपा आले आणि त्यांनी माझ्याकडे दहा हजार रुपये दिले. तुझं त्यांना कशाला सांगतो, असं म्हणून त्यांनी पैसे दिले. मग मी बहिणींना पैसे दिले… असं डीपी सांगतो. त्यावेळी त्याचे डोळे पाणावले होते.
डीपी दादा पुढे म्हणतो, मला वेळ नसतो म्हणून बहीणच दुकानात येते.. कधी कधी काऊंटर सांभाळते. माझं स्वप्न होतं घरात कुणालातरी गुलाल लागला पाहिजे, दिवसरात्र मेहनत घेऊन बहिणीला टॉपच्या लीडने गावात निवडून आणलं.. माझा स्वभाव आहे, मी कधीच कुणाला रिकाम्या हाताने पाठवत नाही. माझ्याकडे १० हजार असतील तर ९ हजार ९०० रुपये देण्याची माझी तयारी असते.
दरम्यान, बिग बॉस मराठीचा यंदाचा पाचवा सीझन टॉप रेडेट सीझन ठरला आहे. त्याचं कारण या सीझनमध्ये अनेक फ्लेवर बघायला मिळत आहेत. घरामध्ये इन्फ्लूएन्सरचा बोलबाला आहे, त्यांना बघायला रसिक टीव्हीसमोर बसतात. परंतु घरामध्ये राडा मात्र दुसऱ्याच टीमचा असतो.
राडा घालणाऱ्या ‘टीम ए’मध्ये अभिनेत्री, मॉडलचा समावेश आहे. हे लोक बळाच्या जोरावर टास्क जिंकतात, धमक्या देतात, राडा घालतात.. नको नको ते बोलतात. त्यामुळेदेखील प्रत्येक घरात हा शो बघितला जातोय.
निक्की तांबोळी नावाच्या स्पर्धकाने तर ज्येष्ठ मराठी अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्याबद्दल वारंवार अपशब्द वापरले आहेत, त्यामुळे मराठी रसिकांमध्ये संताप आहे. मागच्या आठवड्यात कुणीही घराबाहेर गेलं नव्हतं. परंतु येणाऱ्या आठवड्यात एक सदस्य घराबाहेर जाणार आहे. तो कोण असेल, याकडे मराठी रसिकांचं लक्ष लागून राहिलं आहे.