अभिनेता विकी कौशलच्या आगामी ‘छावा’ या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये विकीने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. त्याचा लूक आणि टीझरमधील दृश्ये पाहून प्रेक्षक थक्क झाले आहेत.
अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘स्त्री 2’ हा चित्रपट आज (15 ऑगस्ट) थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट पाहायला गेलेल्या प्रेक्षकांना थिएटरमध्ये आणखी एक सरप्राइज मिळालं. हा सरप्राइज होता, विकी कौशलच्या आगामी ‘छावा’ या चित्रपटाचा टीझर.
या चित्रपटात विकी हा छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत असून त्याचाच टीझर थिएटरमध्ये दाखवण्यात आला आहे. या टीझरचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. या टीझरमध्ये विकी कौशल हा युद्धाच्या मैदानात शत्रूंशी लढताना दिसून येतोय. त्याची कधीही न पाहिलेली बाजू यात दाखवण्यात आली आहे. नेटकरी या टीझरचं कौतुक करत आहेत.
छावा’ या चित्रपटाचं दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केलं असून ‘स्त्री 2’चे निर्माते दिनेश विजन यांनीच या चित्रपटाची निर्मिती केली आहे. ऑस्कर विजेते संगीतकार ए. आर. रेहमान यांनी या चित्रपटाला संगीत दिलं आहे.
यामध्ये विकी कौशलसोबतच रश्मिका मंदाना, अक्षय खन्ना, आशुतोष राणा, दिव्या दत्ता, सुनील शेट्टी यांच्याही भूमिका आहेत. येत्या 6 डिसेंबर रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
या चित्रपटासाठी विकी कौशलने बरीच मेहनत घेतली आहे. त्याचं ट्रान्सफॉर्मेशन या टीझरमध्ये सहज पहायला मिळतंय. या चित्रपटात विकी कौशल हा छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. या भूमिकेसाठी त्याने तलवारबाजी आणि घोडेस्वारीचंही प्रशिक्षण घेतलं आहे.
दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्यासोबत विकीचा हा दुसरा चित्रपट आहे. याआधी दोघांनी ‘जरा हटके जरा बचके’ या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. ‘छावा’ या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपटात अभिनेत्री रश्मिका मंदाना ही येसुबाई भोसलेंच्या भूमिकेत दिसणार आहे.
गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यापासून या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली होती.
“आपण आजवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यावर आधारित अनेक चित्रपट पाहिले आहेत. मात्र छत्रपती संभाजी महाराज हेसुद्धा मोठे योद्धा होते. मराठा साम्राज्य आणि महाराष्ट्रासाठी त्यांचं योगदान काय आहे, हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे”, असं लक्ष्मण उतेकर म्हणाले. या चित्रपटाची कथा डॉ. जयसिंगराव पवार यांच्या पुस्तकावर आधारित आहे.