जोधपूरच्या जेलमध्ये बलात्कार प्रकरणी शिक्षा भोगत असलेल्या आसारामला (Asaram Bapu Parole) राजस्थान हायकोर्टानं मोठा दिलासा दिला आहे. वैद्यकीय कारणासाठी आसारामला 7 दिवसांची पॅरोलवरची रजा मंजूर झाली. आसारामला उपचारासाठी पुण्याच्या माधवबाग आयुर्वेदिक हॉस्पिटलमध्ये भरती करण्य़ात येणार आहे. जोधपूरमधल्या आश्रमात अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी आसाराम 2013 पासून तुरुंगात आहे.
पुण्याच्या माधवबागमध्ये उपचारासाठी येणार
आसारामने याआधीही उपचारासाठी पॅरोलसाठी अर्ज केला होता, मात्र तो प्रत्येक वेळी फेटाळण्यात आला. यापूर्वी आसारामला जोधपूर येथील खासगी आयुर्वेदिक रुग्णालयात उपचारासाठी पोलिस कोठडीत ठेवण्यात आले होते. त्या ठिकाणीही आसारामने पुण्यातील डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार घेतले.
त्यानंतर त्याची प्रकृती खालावल्याने त्याला जोधपूर एम्समध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर आसारामने पॅरोल अर्ज दाखल केला होता. तो आता स्वीकारण्यात आला आणि उपचारासाठी 7 दिवसांच्या पॅरोलवरची रजा मंजूर करण्यात आली.
आसारामने 20 जून रोजी कोर्टाकडे 20 दिवसांच्या पॅरोलची मागणी केली होती. परंतु पॅरोल समितीने त्यास नकार दिला होता.
बलात्कार प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा
85 वर्षीय आसाराम बापू हा 2013 पासून जोधपूर तुरुंगात बंद आहे. आसारामला जोधपूर पोलिसांनी 2013 मध्ये एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी इंदूर येथून अटक केली होती.
आसारामने आपल्या आश्रमातच एका अल्पवयीन विद्यार्थिनीचा लैंगिक छळ केल्याचा आरोप होता. या प्रकरणी पाच वर्षांच्या प्रदीर्घ सुनावणीनंतर 25 एप्रिल 2018 रोजी न्यायालयाने आसारामला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
याशिवाय दुसऱ्या एका प्रकरणातही आसारामला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आला आहे. गुजरातमधील गांधीनगर येथील आश्रमातील एका महिलेने आसारामवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. 31 जानेवारी 2023 रोजी न्यायालयाने आसारामला या प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.