अदानी समूहाविरोधात अहवाल प्रसिद्ध करणाऱ्या हिंडनबर्ग रिसर्चने आता शेअर बाजाराचं नियमन करणाऱ्या ‘सेबी’च्या अध्यक्षा माधबी बुच यांच्यावर आरोप केले आहेत. सेबी म्हणजे सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया होय.
हिंडनबर्ग रिसर्चचा हा रिपोर्ट अदानी समूहावर त्यांनी यापूर्वी प्रकाशित केलेल्या रिपोर्टच्या जवळपास 18 महिन्यांनंतर आला आहे. गेल्यावर्षी म्हणजे, जानेवारी 2023 मध्ये प्रकाशित झालेल्या रिपोर्टने भारतात राजकीय वादळ निर्माण केलं होतं. आता नव्या रिपोर्टनंही राजकीय धुरळा उडण्याची शक्यता आहे.
‘हिंडनबर्ग’ने व्हिसलब्लोअर कागदपत्रांचा संदर्भ देत म्हटलंय की, सेबीच्या अध्यक्षा माधबी बुच आणि त्यांचे पती धवल बुच यांची अदानी समूहाच्या आर्थिक अनियमिततेशी संबंधित असलेल्या ऑफशोअर कंपन्यांमध्ये भागिदारी आहे.
‘इंडियन एक्स्प्रेस’ आणि पीटीआयच्या वृत्तानुसार, सेबीच्या अध्यक्षा माधबी बुच आणि त्यांचे पती धवल बुच यांनी हे आरोप फेटाळूओन लावत निवेदन जारी केले आहे.
दोघांनीही संयुक्त निवेदन जारी करून ‘या आरोपांमध्ये तथ्य नाही’ असं म्हटलं आहे. तसंच, “आमचं आयुष्य आणि आर्थिक व्यवहार खुल्या पुस्तकासारखे आहे.”
हा आहे हिंडनबर्ग चा नवा रिपोर्ट
हिंडनबर्ग रिसर्चने त्यांच्या नव्या रिपोर्टमध्ये म्हटलंय की, ‘सेबीच्या अध्यक्षांकडे ऑफशोर कंपन्यांमध्ये भागीदारी होती, ज्यांचा वापर अदानी समूहाच्या कथित आर्थिक अनियमिततेसाठी केला गेला होता.’
या नव्या रिपोर्टमध्ये पुढे म्हटलंय की, ‘आजपर्यंत सेबीने अदानीच्या इतर संशयित भागधारक कंपन्यांवर कोणतीही कारवाई केलेली नाही, ज्या इंडिया इन्फोलाइनच्या ईएम रिसर्जंट फंड आणि इंडिया फोकस फंडद्वारे चालवल्या जातात.’
सेबीच्या अध्यक्षांच्या या हितसंबंधांमुळे बाजार नियामकाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचं ‘हिंडनबर्ग’नं म्हटलं आहे. सेबीच्या नेतृत्वाबाबत या रिपोर्टमध्ये चिंता व्यक्त केली गेलीय.
हिंडनबर्ग रिसर्चनं म्हटलंय की, ‘अदानी समूहाच्या आर्थिक अनियमिततेत गुंतलेले ऑफशोअर फंड खूपच अस्पष्ट आहेत आणि त्यांची रचना जटील आहे.’
हिंडनबर्ग रिसर्चने म्हटलंय की, ‘व्हिसलब्लोअरकडून मिळालेल्या कागदपत्रांनुसार, सेबीमध्ये त्यांच्या (माधबी बुच) नियुक्तीच्या काही आठवड्यांपूर्वी, माधबी पुरी बुच यांचे पती धवल बुच यांनी मॉरिशसस्थित फंड प्रशासक ट्रायडेंट ट्रस्टला ईमेल केला होता. त्यात त्यांनी आणि त्यांच्या पत्नीच्या ग्लोबल डायनॅमिक अपॉर्च्युनिटीज फंडातील गुंतवणुकीचा उल्लेख केला होता.’
माधबी पुरी बुच यांनी फेटाळले आरोप
पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, माधबी बुच आणि त्यांचे पती धवल बुच यांनी म्हटलंय की, “आमच्यावर लावण्यात आलेले आरोप निराधार असून, ते आम्ही फेटाळत आहोत.”
पुढे या दाम्पत्यानं म्हटलंय की, “आमचं आयुष्य आणि आर्थिक व्यवहार एका खुल्या पुस्तकासारखे आहेत. गेल्या काही वर्षात सेबीला सर्व आवश्यक माहिती दिली गेलीय. कुठलेही आर्थिक कागदपत्र उघड करण्यात आम्हाला अडचण नाही, त्यात असेही कागदपत्रं आहेत, जे आम्ही सर्वसामान्य माणसं असतानाचीही आहेत.”
या प्रकरणाच्या पूर्ण पारदर्शकतेसाठी आम्ही योग्य वेळी संपूर्ण निवेदन जारी करू, असेही बुच दाम्पत्यानं म्हटलंय.
तसंच, “हिंडनबर्ग रिसर्चनं नियमांचं पालन केलं आहे की नाही, याची तपासणी (Enforcement Action) सेबीने केली होती आणि कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्याला उत्तर म्हणून हिंडनबर्ग रिसर्चने आपलं नाव खराब करण्याचा प्रयत्न केला आहे,” असा आरोप बुच दाम्पत्यानं केलाय.
कोण आहेत धवल बुच?
माधबी पुरी बुच यांचे पती धवल बुच हे सध्या प्रसिद्ध गुंतवणूक कंपनी ब्लॅकस्टोन आणि अल्वारेझ अँड मार्शलमध्ये सल्लागार आहेत. ते गिल्डनच्या बोर्डावर नॉन-एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरही आहेत.
त्याच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार, त्यांनी आयआयटी दिल्लीतून शिक्षण घेतले आहे. त्यांनी 1984 मध्ये आयआयटी दिल्लीतूनच मेकॅनिकल इंजिनीअरिंगची पदवी घेतली. धवल बुच हे युनिलिव्हरचे कार्यकारी संचालक देखील होते आणि नंतर ते कंपनीचे चीफ प्रॉक्युरमेंट ऑफिसर बनले. बुच यांनी स्वतःला खरेदी आणि पुरवठा साखळीच्या सर्व पैलूंबाबत तज्ञ असल्याचं म्हटलं आहे.
काँग्रेसकडून चौकशीची मागणी
काँग्रेसने हिंडनबर्ग रिसर्चच्या या नव्या रिपोर्टवर म्हटलंय की, “अदानी मेगा स्कॅमच्या व्याप्तीच्या चौकशीसाठी एक संयुक्त संसदीय समिती (JPC) ची स्थापना करण्यात यावी. तर तृणमूल काँग्रेसने ‘सेबी’च्या अध्यक्षा माधबी बुच यांच्या राजीनाम्याची मागणी केलीय.
हेही वाचा:
कांस्य पदक विजेती मनु भाकर सोबत फोटोशूट करणं जॉन इब्राहम ला पडलं महागात
बिग बॉस साठी रितेश देशमुख घेतो महेश मांजरेकरांपेक्षा दुप्पट फी