कोल्हापूर उत्तरमधून काँग्रेसने राजेश लाटकर यांची उमेदवारी जाहीर करताच काँग्रेसमध्ये अंतर्गत असंतोष उफाळून आला.
उमेदवारीसाठी दावेदार असलेले शहर काँग्रेसचे अध्यक्ष सचिन चव्हाण यांना भेटण्यासाठी लाटकर गेले असता संतप्त चव्हाण समर्थकांनी लाटकर यांनाच धक्काबुक्की केली. यामुळे न भेटताच त्यांना माघारी फिरावे लागले.
दरम्यान, सचिन चव्हाण यांनी अजूनही वेळ गेलेली नाही, उमेदवार बदला, अशी थेट मागणी केली.
एवढेच नव्हे तर पक्षाला आव्हान – देणारी भाषा सहन केली जाणार नाही, अशी भूमिका घेत उमेदवार न बदलण्यावर पक्षश्रेष्ठी ठाम आहेत.
लाटकर यांना धक्काबुक्की झाल्याच्या घटनेचा सचिन चव्हाण यांनी मात्र इन्कार केला आहे.
महाविकास आघाडीने जिल्ह्यातील सर्व म्हणजे दहा उमेदवार जाहीर केले आहेत. यामध्ये काँग्रेसच्या वाट्याला सर्वाधिक ५, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला ३ व शिवसेना ठाकरे गटाला दोन जागा मिळाल्या आहेत.
कोल्हापूर उत्तरच्या जागेचा काँग्रेसमध्ये बरेच दिवस घोळ सुरू होता. आ. जयश्री जाधव यांच्यासह मधुरिमाराजे, शारंगधर देशमुख, सचिन चव्हाण व राजेश लाटकर यांच्या नावाची चर्चा सुरू होती. अखेर लाटकर यांना उमेदवारी जाहीर झाली
त्यानंतर काँग्रेसमध्ये नाराजी नाट्य सुरू झाले. शनिवारी रात्रीपासूनच त्याचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली. काँग्रेस कमिटीवर दगडफेक झाल्यानंतर रविवारी दुपारी लाटकर यांना धक्काबुक्कीचा प्रकार घडला. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर लाटकर यांनी पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची रविवारी भेट घेण्यास सुरुवात केली. दुपारी एकच्या सुमारास नाथागोळे तालीम येथे सचिन चव्हाण यांना भेटण्यासाठी ते आले होते.
त्यांच्यासोबत विनायक फाळके, राजू साबळे, महेश बराले, महेश जाधव आदी होते. चव्हाण आपल्या कार्यालयामध्ये बसले होते. कार्यकर्त्यांनी लाटकर यांना अडविले. चव्हाण भेटणार नसल्याचे सांगितले. यावरून चव्हाण समर्थक व लाटकर यांच्या शाब्दिक चकमक सुरू झाली. चव्हाण यांनीही लाटकर यांना मी आता तुम्हाला भेटू शकत नाही, नंतर भेटतो, असे सांगितले.
त्यानंतर कार्यकत्यांनी लाटकर यांना धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. त्यामुळे लाटकर यांना माघारी जावे लागले.
कोल्हापूर उत्तरमधील जागा कॉंग्रेसकडे राखायची असेल तर उमेदवार बदला. अजूनही वेळ गेलेली नाही. गेल्या ५० वर्षांपासून चव्हाण कुटुंबीय काँग्रेसच्या विचाराने एकनिष्ठपणे काम करत आहे. त्याची दखल घेऊन उमेदवारी मिळाली असती तर काम करण्याची संधी मिळाली असती. फार चांगले काम करता आल असते, असे सचिन चव्हाण यांनी सांगितले.
काँग्रेस कमिटीवरील घटना हा कार्यकर्त्यांचा उद्रेक आहे. या घटनेची जबाबदारी आपण टाळत नाही. पण झालेल्या प्रकाराचे समर्थन करत नाही. काँग्रेस सोडून चव्हाण कुटुंबीय दुसरा विचार करूच शकत नाही. गेली तीस वर्षे आ. सतेज पाटील यांच्या सोबत आहोत. त्यामुळे ते उमेदवार बदलणार नाहीत, हे माहिती आहे. तरीदेखील उमेदवार बदलण्याची त्यांना विनंती आहे, असेही चव्हाण म्हणाले.