अॅडम ब्रिटन (53 वर्षे) यांनी स्वत:ची एक खास प्रतिमा निर्माण केली होती. शांत आणि संवदेनशील व्यक्ती तसंच मुक्या जनावरांची काळजी घेणारा, त्यांच्याबद्दल प्रेम असणारा आणि जगातील एक प्रसिद्ध मगर तज्ज्ञ अशी ही प्रतिमा होती.
मात्र आता जे सत्य समोर येतं आहे ते फारच धक्कादायक आहे.
त्यानुसार अॅडम ब्रिटन हे प्राण्यांवर प्रेम करणारे नाही तर प्राण्यांशी जगातील सर्वाधिक वाईट वर्तणूक करणाऱ्या, प्राण्यांवर अत्याचार करणाऱ्या व्यक्तींपैकी एक आहे.
या आठवड्यात, ब्रिटन यांना डझनभर कुत्र्यांचं लैंगिक शोषण करताना आणि त्यांच्यावर अत्याचार करताना फिल्म बनवण्याच्या आरोपांसाठी एक दशकाहून अधिक काळाच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
प्राण्यांबरोबर क्रौर्यानं वागण्याच्या 56 प्रकरणांमध्ये अॅडम ब्रिटन यांनी बाल शोषणाशी संबंधित चार साधनांचा वापर केल्याचंही मान्य केलं आहे.
जगासमोर ब्रिटन यांची प्रतिमा नेहमीच एक प्राण्यांवर प्रेम करणारा आणि प्राण्यांच्या अधिकारांबद्दल बोलणारा अशी होती.
आता त्याच ब्रिटन यांच्याबद्दल आलेल्या या बातम्यांमुळे जगभरातील त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. ब्रिटनच्या कृत्यांमुळे त्यांच्या मनात तिरस्कार निर्माण झाला आहे.
जगानं ब्रिटन यांना सर्वात मोठ्या मगरीबरोबर पोहताना पाहिलं होतं. त्याचबरोबर स्मॉग या आपल्या पाळीव मगरीला त्यांनी अनेक चित्रपट आणि माहितीपटांच्या शूटिंगमधील वापरासाठी दिल्याचंही ऐकिवात होतं. मात्र आता त्याच ब्रिटन यांची कृत्ये ऐकून जग हा प्रश्न विचारतं आहे की अखेर ते ‘मॅकमिन्स लगूनचा राक्षस’ कसे काय झाले?